संत फॉस्टिना आणि इतर अनेक थोर संतांनी एका विलक्षण आध्यात्मिक अंधाराचा अनुभव घेतला. क्रूसाचे संत योहान यांनी त्याचे वर्णन ‘आत्म्याची अंधारी रात्र’ आणि ‘आध्यात्मिक चैतन्याची अंधारी रात्र’ असे केले. आपल्या श्रद्धेच्या वाटचालीतही आपल्यापैकी प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा ‘अंधार’ अनुभवावा लागेल. परिपूर्णतेकडे वाटचाल करताना आत्म्याचे जे असामान्य शुद्धीकरण घडते, त्यातूनच आपला अंधार उद्भवेल असे नाही; पण आपला प्रतिसाद मात्र त्या संतांसारखाच असला पाहिजे. जीवनात आपण कोणत्याही परिस्थितीतून जात असलो, तरी आव्हाने उभी राहतात तेव्हा त्या थोर संतांनी उच्चारलेले शब्द आपणही म्हटले पाहिजेत: ‘तुझी इच्छा पूर्ण होवो!’ जीवनात कितीही संभ्रम असला किंवा काही अडथळे दिसत असले, तरी देवाच्या इच्छेनुसार वागणे, यातच पावित्र्य आहे (पाहा दैनंदिनी #1237).
‘तुझी इच्छा पूर्ण होवो!’ ही प्रार्थना तुम्ही किती दृढ निश्चयाने करता, यावर चिंतन करा. हे शब्द तुम्ही खरोखर मनापासून म्हणता का? तुमचे मन, इच्छाशक्ती आणि आत्मा यांचे सारे बळ एकवटून तुम्ही हे शब्द म्हणू शकता का? जीवनात इतर सर्व गोष्टींपेक्षा देवाच्या इच्छेला तुम्ही पहिले स्थान दिले आहे का? परीक्षेच्या काळात देवाची इच्छा मनापासून स्वीकारणे श्रद्धेच्या जीवनासाठी विशेष फलदायी ठरते. मोह उद्भवतात तेव्हा, विशेषतः निराशेला शरण जाण्याचा मोह होतो तेव्हा, देवाच्या परिपूर्ण इच्छेनुसार वागण्याचा तुमचा निश्चय पुन्हा दृढ करा. आज या पवित्र कृतीवर चिंतन करा. ते शब्द उच्चारा आणि जितक्या मनापासून म्हणता येतील तितक्या मनापासून म्हणा. ही प्रार्थना रोज करण्यापासून जीवनातील कोणत्याही गोष्टीने तुम्हाला कधीही रोखू नये.
हे प्रभू, जशी स्वर्गात तशी पृथ्वीवरही तुझी इच्छा पूर्ण होवो! आज हीच माझी प्रार्थना आहे. पूर्ण विश्वासाने आणि स्वतःला संपूर्णपणे तुझ्या स्वाधीन करून मी ही प्रार्थना तुला अर्पण करतो. सर्व गोष्टींपेक्षा मी तुलाच निवडतो आणि तुझी इच्छा माझी स्वतःची इच्छा मानतो. हे माझ्या प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
संत मोनिकाची नोव्हेना
(विशेषतः भरकटलेल्या मुलांसाठी केली जाणारी प्रार्थना)
18–26 ऑगस्ट





