मराठी

चिंतन 250: जमिनीवर साष्टांग दंडवत घालून प्रार्थना करणे

हिरोनिमस बॉश, प्रार्थनेत मग्न संत जेरोम, याचे छायाचित्र: फ्रान्स वांदेवाले, CC BY-NC 2.0

व्हिडिओ

प्रार्थना करताना तुम्ही आपल्या प्रभूकडे कसे जाता? प्रेमाने आणि भक्तिभावाने आपला संपूर्ण दिवस त्याला अर्पण करणे आणि दिवसभर आपल्या जिवलग मित्राशी बोलावे तसे त्याच्याशी बोलणे, हे नक्कीच चांगले आहे. पण काही प्रसंगी आपली प्रार्थना उत्कट असली पाहिजे आणि ती तितक्याच उत्कटतेने व्यक्त केली पाहिजे. यासाठी एक मार्ग म्हणजे आपल्या प्रभूसमोर प्रत्यक्ष जमिनीवर साष्टांग दंडवत घालणे. आपल्या खोलीच्या शांततेत किंवा रिकाम्या देवळात अशा प्रकारे प्रार्थना करण्याची संधी शोधा. या ‘उत्कटतेतून’ आपल्या प्रभूपुढील पूर्ण शरणागती व्यक्त झाली पाहिजे. ही प्रार्थना बराच वेळ चालू राहिली पाहिजे आणि ती करताना आपण स्वतःचा पूर्ण त्याग केला पाहिजे. अशी प्रार्थना करणे ही प्रेमाची सुंदर कृती आहे. देवाला जी उपासना अर्पण करणे उचित आहे, ती करण्याचा हा एक मार्ग आहे. आपण त्याची परिपूर्ण उपासना कधीच करू शकत नसलो, तरी शक्य तितक्या पूर्णपणे ती करण्याचे आपले प्रयत्न त्याला आनंद देतात आणि दयेने ओतप्रोत भरलेल्या आपल्या हृदयाजवळ आपल्याला ओढून घेण्यास त्याला वाव देतात (पाहा दिनदर्शिका #1279).

तुम्ही कधी आपल्या प्रभूसमोर साष्टांग दंडवत घालून प्रार्थना केली आहे का? केली असेल, तर ती करत राहा. दररोज अशी प्रार्थना करण्याची संधी शोधा. अजून केली नसेल, तर सुरुवात करण्याची ही चांगली वेळ आहे. काय बोलावे याची काळजी करू नका आणि सुरुवातीला अवघडल्यासारखे वाटले तरी चिंता करू नका. फक्त गुडघे टेका, जमिनीपर्यंत नतमस्तक व्हा आणि आपल्या प्रभूवरचे प्रेम व्यक्त करा. त्याच स्थितीत राहा आणि स्वतःला पूर्णपणे प्रभूच्या स्वाधीन करण्याचा प्रयत्न करा. प्रभू तुमच्या या उपासनेचा स्वीकार करील आणि तुम्हाला आपल्या दयामय पवित्र हृदयाच्या अधिक जवळ घेईल.

हे प्रभू, मी तुझ्यासमोर साष्टांग दंडवत घालतो आणि तुझ्या गौरवासाठी माझे संपूर्ण जीवन निःस्वार्थ भेट म्हणून तुला अर्पण करतो. प्रिय प्रभू, माझे सर्वस्व मी तुला देतो आणि स्वतःसाठी काहीही राखून ठेवू नये, अशी प्रार्थना करतो. तूच माझा देव आणि माझे सर्वस्व आहेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मी माझे जीवन तुझ्या स्वाधीन करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

दुःखी मातेची नोव्हेना
परंपरेनुसार 7–15 सप्टेंबर या काळात ही प्रार्थना केली जाते.

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण