मराठी

चिंतन 83: सदैव प्रार्थना करा

छायाचित्र: रॉबर्ट शेइब, स्रोत: पिक्साबे

व्हिडिओ

‘सदैव’ प्रार्थना करणे अशक्य वाटू शकते. पण हे खरोखर शक्य आहे का? देव खरेच आपल्याकडून अशी अपेक्षा करतो का? हो, हे नक्कीच शक्य आहे आणि देवही आपल्याकडून तशी अपेक्षा नक्कीच करतो. याचा अर्थ असा नाही की आपल्याला रोज दिवसभर चर्चमध्ये प्रार्थना करत बसण्याचे पाचारण आहे. मठातील एकांतवासी जीवनासाठी पाचारण झालेले लोकही असे करत नाहीत. पण सदैव प्रार्थना करणे आवश्यक आहे. याचा अर्थ इतकाच की देवाच्या सान्निध्यात राहण्याची सवय आपल्याला इतकी लागली आहे, की आपले हृदय सदैव त्याच्याजवळ असते. त्याच्या उपस्थितीचे भान आपल्याला नेहमी असते आणि त्याच्या कृपेशी आपला संबंध अखंड राहतो. देवावरील हे प्रेम आपण अंतःकरणात जोपासले, तर आपण सदैव प्रार्थना करत राहू (पाहा दैनंदिनी #346).

तुमचा दिवस कसा जातो याचा विचार करा. बहुतेक वेळ तुमचे मन आणि हृदय कशात गुंतलेले असते? आपल्या प्रभूशी आणि त्याने तुमच्यासाठी आखलेल्या योजनेशी काहीही संबंध नसलेल्या गोष्टींची दिवास्वप्ने पाहण्यात तुमचा फार वेळ जातो का? प्रार्थनेची सवय लावण्यासाठी प्रयत्न करा. दिवसात वेगवेगळ्या वेळी पूर्ण लक्ष देऊन, मनापासून आणि तल्लीन होऊन प्रार्थना करा. मग प्रार्थनेचे ते क्षण दिवसभर तुमच्या सोबत राहू द्या, तुम्हाला आधार देऊ द्या आणि तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला पुढे नेऊ द्या.

हे प्रभू, प्रार्थना कशी करावी हे मला शिकव. प्रार्थनेची सवय माझ्या अंतःकरणात खोलवर रुजव. दररोज काही क्षण असे राखून ठेवायला मला मदत कर, जेव्हा मी माझे सारे लक्ष केवळ तुझ्यावर ठेवीन आणि तुझा शोध घेईन. त्या क्षणांचा अनुभव मी माझ्या प्रत्येक कृतीत जपावा, यासाठी मला मदत कर, म्हणजे माझे मन आणि हृदय सदैव तुझ्याशी एकरूप राहतील. माझ्या प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्यावर आणखी प्रेम करायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

तिसावा दिवस — चिंतने:
वाळवंटातील 40 दिवस & क्रुसाजवळचे 40 दिवस

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत आणि सण