प्रतिमा सौजन्य: needpix.com
गेल्या महिन्याभरात तुम्ही कशा प्रकारे प्रार्थना केली, याकडे मागे वळून पाहिलेत, तर तुम्हाला काय दिसेल? आशा आहे की त्यात देवाला स्वतःला समर्पित करण्याचे, इतरांसाठी विनवणी करण्याचे, देवाची स्तुती आणि आराधना करण्याचे अनेक क्षण तुम्हाला दिसतील. तसेच, देवाचे मनापासून आभार मानण्यात तुमची प्रार्थना रंगली, असेही अनेक क्षण तुम्हाला आठवतील. खरोखर कृतज्ञ असण्यात आणि ती कृतज्ञता प्रार्थनेत व्यक्त करण्यात मोठे सामर्थ्य आहे. कृतज्ञ असण्यासारखे आपल्याजवळ इतके काही आहे, तरीही अनेकदा देवाने आपल्याला दिलेल्या असंख्य आशीर्वादांपेक्षा आपले लक्ष आपल्या अडचणींवरच अधिक खिळून राहते. जीवनातल्या सर्वांत अंधाऱ्या घडीतही पवित्र आत्म्याला कृतज्ञता बाळगण्यासारखे बरेच काही सापडू शकते. अगदी मनापासून देवाचे आभार मानणारी प्रार्थना आपले मन खऱ्या आध्यात्मिक आनंदाच्या उंचीवर नेऊ शकते (पाहा दैनंदिनी #675).
तुम्ही कशाबद्दल कृतज्ञ आहात? दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, देवाने तुम्हाला कोणकोणत्या प्रकारे भरभरून आशीर्वाद दिले आहेत? देवाकडून मिळालेले आशीर्वाद तुम्हाला लगेच आठवत नसतील, तर ते ‘मोजण्यासाठी’ आणखी थोडा वेळ द्यायला हवा, असे ते सूचित करते. देवाने आपल्याला दिलेल्या असंख्य आशीर्वादांकडे लक्ष देणे, ते ओळखणे, एकेक करून त्यांचा उल्लेख करणे आणि त्यांत आनंद मानणे चांगले आहे. जितके अधिक आशीर्वाद आपल्या लक्षात येतात, तितकी आपली कृतज्ञता वाढते; आणि जितकी आपली कृतज्ञता वाढते, तितके अधिक आशीर्वाद आपल्याला लाभतात.
हे प्रभू, माझ्या जीवनातील असंख्य आशीर्वादांबद्दल मी अंतःकरणापासून तुझे आभार मानतो. त्या आशीर्वादांची जाणीव मला दिवसेंदिवस अधिक होत जावी आणि त्यांबद्दल कृतज्ञ राहता यावे, म्हणून मला मदत कर. जीवन हीच एक देणगी आहे आणि तू रात्रंदिवस माझ्या जीवनात कार्य करीत आहेस, हे मला जाणू दे. जीवन कठीण होते किंवा एखाद्या ओझ्याखाली मी दबून जातो, तेव्हा विशेषतः हे आशीर्वाद मला दिसू दे. माझे हृदय कृतज्ञतेने भरून जावो आणि तुझ्या चांगुलपणात मला सदैव आनंद लाभो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
पवित्र आत्म्याची नोव्हेना
पेन्टेकॉस्टच्या तयारीसाठी केली जाणारी प्रार्थना
शुक्रवार, 15 मे – शनिवार, 23 मे
पुनरुत्थान सोहळ्याच्या प्रार्थना
पास्का काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने




