मराठी

चिंतन 192: सुखदुःखात देवावर प्रेम करणे

ख्रिस्ती हुतात्म्यांची शेवटची प्रार्थना, जाँ-लेओं झेरोम यांचे चित्र

व्हिडिओ

सर्व काही सुरळीत असताना देवावर “प्रेम” करणे सोपे असते. पण सर्व काही सुरळीत असताना, आपल्या प्रेमाची परीक्षा होत नाही. मानवी दुःखामुळे होणाऱ्या परीक्षेत आपले देवावरचे प्रेम किती खरे आहे, हे स्पष्ट होते. ही परीक्षा आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी फार फलदायी ठरू शकते. जीवनातील अडचणी म्हणजे केवळ दुःखद आणि दुर्दैवी ओझी आहेत आणि ती कोणत्याही किंमतीत टाळली पाहिजेत, असे मानणे सोपे असते. मुद्दाम अडचणी निर्माण करणे मूर्खपणाचे ठरेल; तरीही या जीवनात आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला काही अडचणी येणारच. म्हणून जीवनातील प्रत्येक अडचण आणि प्रत्येक दुःख यांचा स्वीकार देवावरचा तुमचा विश्वास वाढवण्याची आणि त्यातून त्याच्यावरचे तुमचे प्रेम वाढवण्याची संधी म्हणून केला पाहिजे. या जीवनात अपार दुःख सोसत असतानाही जो जीव देवावर प्रेम करत राहण्याचे निवडतो आणि त्या दुःखातून पवित्रतेत वाढतो, तो किती धन्य आहे! (पाहा दैनंदिनी #1014).

दररोज तुम्ही कशाबद्दल तक्रार करता? कोणत्या गोष्टीचे ओझे तुम्हाला जाणवते? अनेकदा आपण या ओझ्यांपासून पळ काढतो किंवा रागावतो. आपल्या संघर्षांकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा. तुमचा विश्वास आणि प्रेम अधिक दृढ करण्याच्या संधी म्हणून त्यांच्याकडे पाहा. जीवनातील प्रत्येक दुःख आणि प्रत्येक ओझे क्रुसाच्या आध्यात्मिक सामर्थ्याने भरून जाऊ शकते. त्यांचा प्रेमाने स्वीकार करून आपण क्रुसाचा स्वीकार करतो. आणि क्रुसाचा स्वीकार केल्याने देवावरचे आपले प्रेम आणखी वाढते. संकटांमुळे आपले जीवन निकृष्ट होते, असे समजू नका. कृपेने त्यांचे खरे स्वरूप ओळखा. पवित्रतेत वाढण्याच्या आणि देवाची दया अधिकाधिक ग्रहण करण्याच्या त्या संधी आहेत.

हे प्रभू, मी सोसत असलेल्या अडचणींमुळे जेव्हा मी खिन्न होतो, रागावतो किंवा निराश होतो, तेव्हा त्या संघर्षातून तुझ्यावरचा माझा विश्वास अधिक दृढ करण्यास मला मदत कर. हे प्रभू, क्रुसाकडे धाव घेण्याची आणि तुझ्या क्रुसातून ओसंडून वाहिलेले प्रेम स्वीकारण्याची माझी इच्छा आहे, जेणेकरून मी सर्व बाबतींत अधिकाधिक तुझ्यासारखा होईन. हे प्रिय प्रभू, माझे प्रेम वाढव, विशेषतः जीवनातले जे जे दुःख मी तुला अर्पण करतो, त्या प्रत्येक दुःखातून ते वाढव. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

11 जुलै – मठाध्यक्ष संत बेनेडिक्ट यांचे स्मरण

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण