मराठी

चिंतन 244: जगाच्या अंतापर्यंत कार्य करणे

प्रतिमा: अ‍ॅडोबी स्टॉक

व्हिडिओ

देवाच्या कार्याचा प्रसार करण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस श्रम करत असाल, तर ते चांगले आहे. देवाच्या इच्छेनुसार वागण्याच्या आणि त्याच्या दैवी दयेचा प्रसार करण्याच्या तुमच्या निष्ठेला चांगले फळ येईल. पण हेही आपण लक्षात घेतले पाहिजे की जगाच्या अंतापर्यंत आपल्या दयेचा प्रसार करण्यासाठी देव आपला उपयोग करू शकतो. कसा? हे फक्त देवच जाणतो. पण या हेतूसाठी तुमचा उपयोग करण्याची त्याची इच्छा आहे. संत फॉस्टिनांसारख्या काही व्यक्तींच्या माध्यमातून देवाने दैवी दयेच्या भक्तीची सुरुवात केली. येशू पुन्हा येईपर्यंत ही भक्ती चालू राहील. इतरांना, आणि कदाचित आपल्यापैकी बहुतेकांना, दयेच्या या अखंड कार्यात वेगवेगळ्या प्रकारे हातभार लावण्याचे पाचारण आहे. उदाहरणार्थ, प्रेमाची एक कृती दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनात असे काही चांगले घडवू शकते की त्या व्यक्तीत बदल होईल आणि त्यातून दयेच्या चिरंतन कार्याला सुरुवात होईल. किंवा ज्यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे अशा पोप, बिशप किंवा धर्मगुरूंसाठी तुम्ही करता त्या प्रार्थनेचा विचार करा. याचाही विचार करा की इथे आणि आत्ता तुम्ही प्राप्त केलेले पावित्र्य स्वर्गात अधिक तेजाने झळकेल आणि त्यामुळे तुम्हाला सर्व काळ ख्रिस्तसभेसाठी मध्यस्थी करता येईल. देवाच्या दयेचा प्रसार करण्याचे काम आज मन लावून करा; पण हे कार्य अनंतकाळ चालू राहिले पाहिजे, हेही ध्यानात ठेवा. हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवा, म्हणजे देव तुमच्या आजच्या श्रमांचा सर्व काळांत अशा रीतीने उपयोग करील की त्याची तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही (पाहा दैनंदिनी #1256).

देवाने तुमच्यावर सोपवलेल्या कार्याचा विचार करता, त्या कार्याचे परिणाम अनंतकाळ टिकू शकतात, असे तुम्हाला वाटते का? सर्व काळांत ख्रिस्तसभेला बळ देण्यासाठी देव ज्या साखळीचा उपयोग करू इच्छितो, तिच्यातील ‘एक दुवा’ म्हणून तुम्ही स्वतःकडे पाहता का? हे ध्येय मनापासून स्वीकारा आणि तुम्ही स्वतः कल्पनाही करू शकणार नाही अशा रीतीने प्रभूला तुमचा उपयोग करू द्या.

हे प्रभू, माझे जीवन तुझे आहे. आता आणि अनंतकाळ तुझ्या दयेचा प्रसार व्हावा म्हणून मी स्वतःला तुला अर्पण करतो. हे प्रिय प्रभू, तुझ्या इच्छेप्रमाणे माझा उपयोग कर. आपल्या या जगात तुझ्या दयेचे साधन होण्यासाठी मी स्वतःला आनंदाने अर्पण करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण