मराठी

चिंतन 310: त्या दुष्टाचा मूर्खपणा

संत अँथनींची मोहपरीक्षा, चित्रकार: दोमेनिको घिर्लांदायो

व्हिडिओ

सैतान खरोखर आहे आणि तो घालतो ते मोहही खरे आहेत. तो तुमचा निखळ द्वेष करतो आणि तुमचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा आहे. हे जाणून घेणे तुमच्या हिताचे आहे. पण तो दुष्ट फार धूर्त आहे आणि कपटाने तुम्हाला आपल्या कह्यात आणू पाहतो. तो तुमच्याशी क्वचितच उघड उघड खोटे बोलतो, कारण अशा मोहाला तुम्ही बहुधा बळी पडणार नाही, हे त्याला माहीत आहे. त्याऐवजी तो आपल्या बोलण्याने तुमच्या मनात गोंधळ निर्माण करू पाहतो. अर्धवट खऱ्या गोष्टी हेरून त्यांत सहज लक्षात न येणारी असत्ये मिसळतो, जेणेकरून तुमची दिशाभूल होईल. एखाद्या गोष्टीचाच विचार तुमच्या मनात पुन्हा पुन्हा येत राहतो, असे तुमच्या लक्षात येऊ शकते. तुमच्या विचारांत काही तथ्य आहे असे वाटेल, पण विचार करत राहिल्यावर मन उदास आणि गोंधळलेले होऊ लागते. अशा वेळी विचार करणे थांबवा आणि देवाच्या दयेकडे धाव घ्या. जेव्हा तुमचे विचार देवामध्ये रममाण होतात तेव्हा मन ताजेतवाने आणि हलके होते. तुम्हाला नवा आनंद लाभतो आणि गोष्टी अधिक स्पष्ट दिसू लागतात. पण जेव्हा तो दुष्ट तुमच्यावर आपला प्रभाव पाडू लागतो, तेव्हा त्याच्या उलट परिणाम तुमच्या आत्म्यात जाणवतात. त्याच्या छुप्या फसवणुकीबाबत सावध राहा आणि तिकडे लक्ष देऊ नका (पाहा दैनंदिनी 1497-1499).

आज तुम्ही कसा विचार करता, यावर चिंतन करा. कारण मोहात पाडणारा तुमच्या विचारांतूनच सर्वांत जास्त अनर्थ घडवतो. एखादी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला कसे वाटते, याचाही विचार करा. विशेषतः तुमच्या विचारांचे काय परिणाम होतात, याकडे लक्ष देऊन आत्म्यांचा विवेक करण्याचा निश्चय करा. जेव्हा जेव्हा तुम्हाला गोंधळल्यासारखे वाटते किंवा आपली दिशाभूल झाली आहे असे जाणवते, तेव्हा तेव्हा प्रभू तुम्हाला आपल्या दयेकडे धाव घेण्यास बोलावतो. अशा क्षणी सावध राहा आणि लक्षात ठेवा की हे त्या दुष्टाने घातलेले मोह असू शकतात. प्रभूवर नेहमी विश्वास ठेवा आणि आपले विचार सतत त्याच्या पवित्र दयेला सोपवा.

हे प्रभू, त्या दुष्टाच्या खोटेपणापासून आणि सापळ्यांपासून माझे सदैव रक्षण कर. तुझ्या परमपवित्र नावाने मी त्याला आणि त्याच्या कृत्यांना धिक्कारतो आणि माझे सर्व विचार तुझ्या स्वाधीन करतो. ये, माझ्या जीवनात तुझी दया आणि सत्य विपुल प्रमाणात ओत आणि सारा अंधार व उदासी दूर कर. हे प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

सदस्य व्हा आमच्या यूट्यूब चॅनेलचे!
नवीन सामग्री प्रसिद्ध झाल्यावर सूचना मिळवा.

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण